December 29, 2025
WhatsApp Image 2025-12-23 at 1.22.42 PM

ग्रामीण व आदिवासी क्षेत्रांमध्ये शेती हा आजही रोजगार व उपजीविकेचा आधारस्तंभ आहे. महाराष्ट्रातील जव्हार येथील एका आदिवासी पाड्यातील शेतकरी चंद्रकांत सोन्या अंधेर एकेकाळी भारतभरातील हजारो शेतक-यांप्रमाणे हालाखीचे आयुष्य जगत होते. केवळ मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण आणि दोन एकरांची पर्जन्याधारित शेतीयोग्य जमीन इतकीच पुंजी गाठीशी असलेल्या चंद्रकांत यांचा उदरनिर्वाह लहरी पाऊस आणि पाण्याची सततची टंचाई यांवर विसंबून होता. चंद्रकांत यांची उर्वरित जमीन शेतीयोग्य नसल्याने त्यांना इतर हंगामांत कुटुंबाला मागे ठेवून आजुबाजूच्या शहरांत मोलमजुरीसाठी जाणे भाग होते – या कामात उत्पन्नाची हमी फार थोडी होती आणि प्रगतीचा कोणताही स्पष्ट मार्ग दिसत नव्हता. टाटा मोटर्सचा इंटिग्रेटेड व्हिलेज डेव्हलपमेंट प्रोग्राम (IVDP) या दुर्गम पाड्यामध्ये आणि चंद्रकांत यांच्या आयुष्यात सर्वांगीण विकासाची आशा घेऊन आला. विविध सरकारी योजनांना एकत्रितपणे केंद्रस्थानी ठेवत स्थानिक समुदायांना सामोरी येत असलेल्या आगळ्यावेगळ्या आव्हानांबरहुकूम बेतलेल्या बहुस्तरीय, शाश्वत कार्यचौकटीच्या अंमलबजावणीत IVDP चे सार सामावलेले आहे. 

टाटा मोटर्सने चंद्रकांत यांना आपल्या उत्पन्नाला जोड देण्यास मदत व्हावी यासाठी विविध सरकारी योजनांचा लाभ मिळविण्याचे काम सुकर केले. चंद्रकांत यांनी जलसंवर्धनासाठी शेततळे बांधले, तुटपुंज्या पाण्याचा काटेकोरपणे वापर करण्यासाठी ठिबक सिंचन यंत्रणा लावली आणि इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी बायो-गॅस युनिट बसवले. IVDP ने त्यांना कृषी-वनीकरणांतर्गत वृक्षलागवड, मत्स्यशेतील, सोलर पॅनेल बसविणे, बांबू लागवड व उच्च-मूल्य पिकांसाठी नर्सरी युनिट यांच्या मार्फत पिक व उत्पन्नामध्ये विविधता आणण्यासही मदत केली.  या प्रयत्नांचे परिणाम परिवर्तनकारी ठरले आहेत. खात्रीचा जलपुरवठा, शेतीच्या सुधारित पद्धती आणि उत्पन्नाचे विविध स्त्रोत यांच्यामुळे चंद्रकांत यांच्या शेतजमिनीची उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढली. आता त्यांना घरगुती गरजा व्यवस्थित पूर्ण करता येतात, वरकड उत्पन्नाची ते विक्री करतात व त्यांच्या वार्षिक उत्पन्नात दुप्पट वाढ झाली आहे. त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात गुंतवणूक केली आहे, आपल्या कुटुंबाला ते अधिक चांगल्या आरोग्यसेवा पुरवित आहेत व आपल्या जमिनीवर त्यांनी आणखी एक घर बांधले आहे – यातून “लखपती किसान” बनण्याच्या दिशेने त्यांचा प्रवास सिद्ध झाला. 

आपल्यातील आमूलाग्र बदलाविषयी आपले विचार व्यक्त करताना चंद्रकांत यांनी सांगितले, “पाण्याच्या अभावामुळे माझी बहुतांश जमीन निरुपयोगी होती आणि मला दरवर्षी आपल्या कुटुंबाला सोडून महिनोंमहिने दूर जाऊन रहावे लागत होते. मात्र टाटा मोटर्सने आम्हाला आशा दिली आणि पुढे जाण्याचा एक व्यवहार्य मार्ग दाखवून दिला. आज, मला स्थलांतरीत होण्याची गरज उरलेली नाही. या आधारामुळे माझ्या कुटुंबाचे नशीब पूर्णपणे नव्याने लिहिले गेले आहे.”

टाटा मोटर्समध्ये सीएसआर विभागाचे प्रमुख विनोद कुलकर्णी सांगतात, “एक हंगामी, स्थलांतरित मजूर इथपासून ते स्वत:वर विश्वास असलेला, आत्मनिर्भर शेतकरी इथपर्यंतचा चंद्रकांत यांचा प्रवास समुदाय-केंद्री ग्रामीण विकासाच्या पद्धतीची ताकद दाखवून देतो. चंद्रकांत आणि शेतकरी समाजाकडून असुरक्षिततेचे चक्र भेदले जात असताना, त्यामुळे आमची शाश्वत सामाजिक विकास प्रारूपे अधिक व्यापक पातळीवर वापरण्यासाठी व प्रतिकृत करण्यासाठी सरकारी योजनांचा वापर करण्याप्रती आमचा निर्धार अधिकच पक्का झाला आहे.” चंद्रकांत यांच्या प्रेरणादायी यशोगाथेमुळे इतर शेतक-यांनाही आपल्या उपजीविकेच्या मार्गांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची, शेतीची नाविन्यपूर्ण तंत्रे अंगिकारण्याची व त्यायोगे स्थलांतराचे आव्हान दूर ठेवण्याची प्रेरणा मिळाली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *